माजी आमदार नरेंद्र पवार यांचा गंभीर आरोप
कल्याण : कल्याणकरांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या नविन पत्रीपुलाच्या कामाला दिरंगाई होण्याला सर्वस्वी पालकमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचा गंभीर आरोप कल्याण पश्चिमेचे माजी भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे. आपण आमदार असताना हा पत्रीपुल लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्नशील होतो. तसेच अधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीतही हे काम पूर्ण होण्यासाठी फेब्रुवारी २०२० उजाडेल असे अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितले होते. परंतू या कामाचे श्रेय मिळू नये आणि निवडणुकीत आपल्याला फटका बसावा यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रीपुलाच्या कामाला जाणीवपूर्वक विलंब केल्याचा आरोप माजी आमदार निर्मितीच्या पवार यांनी केला.
या पुलामुळे दररोज हजारो लोकांना किती त्रास होत होता हे पाहत असल्याने आपण त्याचा पाठपुरावा करीत होतो. परंतू या कामाला गती येण्यासाठी आवश्यक ते सहकार्य पालकमंत्री करत नसल्याची माहितीही आपल्याला अधिकाऱ्यांनी दिल्याचे पवार यांनी सांगितले. केवळ पत्रीपूलच नव्हे तर त्यावेळी कल्याणात रस्त्यावर पडलेले खड़े, दुर्गाडी पूल या सर्वांना पालकमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असून त्यावेळी ते पालकमंत्री नव्हे तर मालकमंत्र्यांप्रमाणे वागले असा । घणाघाती आरोपही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी आपण आंदोलन करणार असल्याचे सांगत पालकमंत्री, संबंधित अधिकारी, मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान पत्रीपलावरून कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांनीही बॅनरवर दिलेली फेब्रुवारी २०२० ही तारीख म्हणजे शिवसेनेची प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगत शिवसेनेला चिमटा काढला.