२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यासाठी शासनस्तरावर जोरदार हालचाली सुरु

कल्याण :- कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यासाठी शासनस्तरावर जोरदार हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या कीनंतर स्वतंत्र नगरपालिकेसाठी यापूर्वी आलेल्या हरकती, सूचनांवर कोकण विभागीय आयुक्तांकडे बुधवार दि. ११ व १२ मार्च रोजी गावांची सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे गेली चार वर्षे महापालिकेतून गावे वगळण्यासाठी लढणाऱ्या ग्रामस्थांचे स्वतंत्र नगरपालिकेचे स्वप्न दृष्टिक्षेपात आले आहे.


राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर २७ गाव वगळण्यासाठी सर्वपक्षीय संघर्ष समितीसह येथील ग्रामस्थांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. त्याची दखल घेत काही दिवसांपूर्वी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यासमवेत बैठक घऊन राज्य शासन याबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले विधिमंडळाच्या सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यानीही २७ गावाची स्वतंत्र नगरपालिकेचा निर्णय राज्य शासन अधिवेशन संपण्याच्या आधी घेणार काअसा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतानाही नगरविकास मंत्र्यांनी कोकण आयुक्तांचा अहवाल आल्यावर लवकरच निर्णय घेऊ, असे सांगितले होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्वत:देखील दोन दिवसांपूर्वी २७ गाव परिसरातील लोकप्रतिनिधी, तसेच सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन सर्वांची मते जाणून घेतली. अधिवेशनातच याबाबत निर्णय जाहीर करु, असे आश्वासन त्यांनी दिल्याचेही बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर कोकण आयुक्तांकडे २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेच्या हरकती, सूचनांवर सुनावणीचा कार्यक्रम कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जाहीर केला आहे. यामध्ये बुधवारी १ मार्च रोजी सकाळी ११ ते सायं. ५ या वेळेत घेसर, हेदुटणे, उंबोली. भाल. द्वारली, माणेरे, वसार.आशेळे. नांदिवली तर्फे, अंबरनाथ, आडीवली-ढोकळी, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, तर दि. १ मार्च रोजी सोनारपाडा, माणगाव, कोळे, निळज, काटई, उसरघर, घारिवली, संदप, भोप, सागांव, नांदिवली पंचानंद, आसदे, देसले या गावांतील नागरिक, लोकप्रतिनिधी, तसेच संस्थांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.