अशुद्ध पाण्याची विक्री २५ पाणीविक्री व्यवसायिकांवर गुन्हे दाखल

वसई :- आरोग्यास अपायकारक असे अशुद्ध पिण्याच्या पाणी विक्री वसई-विरार परिसरात केली जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. यासाठी वसई-विरार महानगरपालिकेतर्फे मागील महिन्यात पिण्याचे दूषित पाणी विक्री करणाऱ्या ५१ व्यवसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता २५ व्यावसायिकांवर वालीव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. साथीच्या विविध आजारांपासून रक्षण व्हावे, यासाठी वसई-विरार शहरातील सुमारे ७० टक्क्यांहून अधिक लोक दैनंदिन पिण्याच्या वापरासाठी पाणी बाहेरून खरेदी करतात. सध्या नागरिक विकत घेऊन पीत असलेले हेच पाणी आरोग्यास घातक असल्याची माहिती नुकतीच समोर आली. पिण्याच्या पाण्याची विक्री करणाऱ्या अनेक बोगस कंपन्या वसई-विरार शहरात ठिकठिकाणी बस्तान मांडून बसल्या आहेत. यासाठी भाजपच्या अशोक शेळके यांनी या गंभीर प्रकरणी सातत्याने पत्रव्यवहार-पाठपुरावा करून राज्य सरकार, महानगरपालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधले. अशोक शेळके यांच्या मागणीनंतर वसईविरार शहरातील पाणी विक्रेत्यांकडे पाण्याचे नमुने तपासण्याचा निर्णय घेण्यात आलाहोता. हे नमुने तपासल्यानंतर पाणी अपायकारक असल्याचे समजताच वसईविरार शहर महानगरपालिकेच्या ब प्रभाग समितीतर्फे ५१ पाणी विक्रेत्या व्यावसायिकांवर सर्वप्रथम तुळींज पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर हे कारवाईचे सत्र असेच सुरू असून आता प्रभाग समिती एफतर्फे २५ पाणी व्यावसायिकांवर वालीव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुनील ब्राम्हणे, कुमार वझे, अलीम खान, अनवर हुसेन, वामन सुरासे, अब्दुल खान, अबूसामा खान, बसंतलाल यादव, मनोज सिंग, समिम शेख, संजय प्रजापती, लालधारी यादव, अली खान, बबलू भाई, बबू सिंग, रमाशंकर पांडे, नईम शेख, उग्रसेन पाठक, ऐहसान शेख, राजेंद्र कुमार, संजय गुप्ता, शेहनाज शेख, अख्तर शेख, गुड्ड सिंग, राकेश सिंग, सुभाष सिंग या पाणीविक्रेत्यांवर गुन्हे दाखल झाले.