लाभ मिळण्यात शेतकयांना अडचणी येऊ देऊनका

मुंबई :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील २१ लाख ८२ हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी आज सहकार विभागाने प्रसिद्ध केली. या यादीतील शेतकऱ्यांनाही व्यवस्थित लाभ मिळेल आणि त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या तत्काळ सोडविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आत्तापर्यंत १ लाख २५ हजार ४४९ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले असून उद्या रविवार सुट्टी असल्यामुळे सोमवारपासून त्यांच्या बँकांत पैसे जमा होतील, अशी माहिती सहकार प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी दिली.



महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पहिली प्रायोगिक तत्वावरील यादी २४ फेब्रुवारी रोजी लावण्यात आली होती. त्यात ६८ गावांतील १५ हजार ३५८ कर्ज खाती जाहीर करण्यात आले होते. या दुस्रया यादीनंतर राज्यात आतापर्यंत २१ लाख ८२ हजार खात्यांच्या याद्या गावनिहाय जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यात १५ जिल्ह्यात पुर्णांशाने तर ग्रामपंचायत निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने १३ जिल्ह्यात अंशत: याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. अशा रितीने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना- २०१९ मधील अपेक्षित अशा ३६ लाख ४५ हजार कर्जखात्यांपैकी पोर्टलवर ३४ लाख ९८ हजार खात्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी गावनिहाय यादी प्रसिद्ध केलेल्या खात्यांची संख्या २१ लाख ८२ हजार इतकी आहे. शासनाने या खात्यांच्या कर्जमुक्तीसाठी १४ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितामुळे ६ जिल्ह्यातील गावांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या नसल्याचे सहकार विभागाने सांगितले आहे. या प्रमाणीकरणानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर व्यापारी बँका २४ तासांमध्ये तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ७२ तासांमध्ये रक्कम जमा करणार आहेत.