जिल्ह्यात ८ मार्च ते २२ मार्चपर्यंत साजरा होणार पोषण पंधरवडा

ठाणे :- ठाणे जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जिल्ह्यात ८ मार्च ते २२ मार्च २०२० या कालावधीत पोषण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या पंधरवड्याची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रभारी) ब. भि. नेमाने यांनी आज केले. यशवंतराव चव्हाण सभागृहात अभियानाच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. नेमाने सर्व सबंधित यंत्रणांशी संवाद साधला. या पोषण पंधरवड्यातून शून्य ते सहा वयोगटाच्या बालकांमधील कुपोषण कमी करणे, किशोरवयीन मुली आणि महिलांमधील रक्ताल्पता (अनेमिया) कमी करणे. आणि जन्मत:कमी वजनाचे असणाऱ्या बालकांचे प्रमाण कमी करणे आदि उद्दिष्ट्ये या अभियानातून साध्य करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायत, अगणवाडी, शाळा, आरोग्य उपकेंद्र, महिला बचत गट आदि माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारनेच कोणता उपक्रम कोणत्या दिवशी घेण्यात यावा याचे नियोजनबद्ध वेळापत्रक तयार केले आहे. जिल्हास्तरावर या वेळापत्रकाची काटेकोरपणेअंमलबजावणी करण्यात येणार आहे. तशा सूचना देखिल श्री. नेमाने यांनी आजच्या बैठकीत सर्व जिल्हा आणि तालुकास्तरीय अधिकायांना दिल्या आहेत. असे असतील


पोषण पंधरवड्याचे उपक्रम


८ मार्च रोजी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर या पंधरवड्याचा शुभारंभ होईल. त्यानंतर ग्रामसभा बैठकीचे आयोजन करणे, प्रभातफेरी काढणे, पोषण प्रतिज्ञा घेणे, शाळा व अंगणवाडी न्युट्री गार्डन आणि रुफ टोप गार्डन तयार करणे, आशा, एएनएम, अंगणवाडी सेविकां मिळून गृह भेटी, सायकल फेरी, मातांची पाककला स्पर्धा, ६ महिने ते ५९ महिन्यामधील बालके, गर्भवती व स्तनदा माताआणि वडील व पती यांच्या रक्तक्षयाच्या प्रतिबंधासाठी शिबिराचे आयोजन करणे, पोषण आहार, लोहयुक्त आहार यासबंधी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेणे, पालकमेळावा घेणे , स्तनपान आणि पोषणाचे १ हजार दिवस यावर जागरूकता सत्र, पोषण निरीक्षकाची नेमणूक करणे, युवा बैठका, वडिलांना वरचा आहार बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवणे व अंगणवाडीतच बालकांना वरचा आहार भरविणे, आजी-आजोबा तसेच वडिलांची पोषणयक्त आहार बनविण्याची स्पर्धा आयोजित करणे, आदि उपक्रम या पंधरा दिवसात राबविण्यात येणार आहेत. अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास संतोष भोसले यांनी आजच्या आढावा बैठकीत दिली. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शेषराव बडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संगीता भागवत, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लक्ष्मण पवार, कृषि विकास अधिकारी मनोजकुमार ढगे, तालुका आरोग्य अधिकारी अंजली चौधरी, विविध विभागाचे विस्तार अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, आरोग्य, शिक्षण ग्रामपंचायत, महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.